👉 लॉकडाऊन मधला व्यायाम
पुन्हा एकदा लॉकडाऊन चालू झाले जिम फिटनेस सेंटर बंद झाल्या. आता व्यायाम कसा करणार, कोरोना काळात खरेतर व्यायामाची आणि प्राणायाम करण्याची खूप आवश्यकता आहे. वजन नियंत्रित ठेवण्यासाठी व्यायाम हा नियमित करावाच लागतो. लॉकडाऊन मध्ये तुम्ही दिवसभर लोळत टीव्ही बघत वेळ घालवू नका, जेवढ्या वेळा तुम्ही शारीरिक हालचाली कराल तेवढे तुम्ही कॅलरी बर्न कराल, नाहीतर दिवस बसून घालवायचा आणि जेवण मात्र नेहमीप्रमाणे त्यामुळे तुम्ही जास्त फॅटी बनवत जाल. गेल्यावर्षी जेव्हा लॉकडाऊन झाला तेव्हाही लोकांची वजने खूप वाढली होती, त्याचे कारण हेच होते, त्यासाठी तुम्ही दिवसभरातील छोटी-मोठी कामे स्वतः करा. प्रत्येक गोष्टीसाठी लहान मुलांना वाकू नका एखादी छोटी वस्तू आणायची असेल तर घरच्या लहान मुलांना सांगतो ते न सांगता स्वतः उठून ती वस्तू आणा व स्वतः ती जागेवर ठेवा. जर बिल्डींग मध्ये लिफ्ट असेल, तर जिन्याचा वापर करा. घरातील लहान-मोठी कामे तर बायकांना करायला लागतात, पण जर तुम्ही घरात कामे करत नसाल तर, घरातील छोटी-मोठी कामे करा घरच्या माणसांना मदत करून तुम्ही ॲक्टिव राहाल ,आणि घरच्या माणसांना ही समाधान मिळेल. आता लॉकडाऊन मध्ये वर्क फ्रॉम होम असेल, तर कॉम्प्युटर समोर बसून काम करावे लागते. त्यामुळे बॅकपेन, नेकपेन चालू होते, यासाठी प्रत्येक तासाला फक्त पाच मिनिट काढून त्या वेळेत तुम्ही स्ट्रेचिंग किंवा त्याच आवारात चालू शकता किंवा उड्या मारू शकता.
प्रत्येकी एका तासाला पाच वेळा जरी केले तरी 25 मिनिटाचा व्यायाम होईल. आणि दिवसभर ऍक्टिव्ह राहाल. बसताना नेहमी ताठ बसावे, कारण चुकीच्या पद्धतीने जर बसत असाल तर बॅकपेन चा त्रास अजून वाढू शकतो. आता हे झाले दिवसभर ॲक्टिव राहण्याबद्दल, पण जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल किंवा कोणतेही फिटनेस टार्गेट असेल तर तुम्ही घरच्या घरी नियमित पणे एक तास तरी व्यायाम चालू ठेवावा. व्यायाम जर तुम्ही कधी केलाच नसेल तर सुरुवात करताना वॉकिंग पासून करावी,जेणेकरून कोणताही त्रास शरीराला होणार नाही. थोड्या दिवसाने फास्ट चालणे, त्यानंतर अर्धा तास चालणे आणि इतर व्यायाम अर्धा तास करणे, जसे सूर्यनमस्कार, पुशअप्स व्यायाम घरच्या घरी करू शकता, याशिवाय दोरी उड्या मारणे, आपल्या घरात जिना असेल, जिन्याच्या स्टेप चढणे-उतरणे, असे खुप सारे व्यायाम प्रकार घरच्या घरी तुम्ही करू शकता. काही लोक वॉकिंग पासून सुरुवात करतात आणि वर्षभर त्यांची वाकिंग चालू असते आणि वजन का कमी होत नाही अशी अपेक्षा ठेवतात व्यायाम चालू केल्यावर व्यायामामध्ये थोडी थोडी सुधारणा करणे गरजेचे असते. फक्त तुम्ही मनापासून आपल्या शरीरासाठी एक तास तरी नियमितपणे काढायचा आहे. ठरलेल्या टाइममध्ये उठायचे आहे आणि त्या टाइम मध्ये व्यायाम करायचे आहे. हे मनात ठरवुनच नियमितपणे केले पाहिजे तरच तुमचा व्यायाम नियमित पणे होईल. सुरुवातीला प्राणायाम साठी कमीत कमी पंधरा मिनिटे तरी वेळ काढा. कारण आता कोरोना काळात ऑक्सीजन लेवल वाढवणे खूपच गरजेचे आहे. जर तुम्हाला प्राणायाम येत नसेल तर सुरुवातीला फक्त आपल्या श्वासावर लक्ष ठेवून जमेल तेवढा दीर्घ श्वास घेऊन हळू हळू श्वास सोडण्याची प्रॅक्टिस करावी. प्राणायाम हा शक्यतो मोकळ्या वातावरणात करा. बंद खोली असेल तर घराच्या खिडक्या उघडून प्राणायाम करावा प्राणायाम करण्यासाठी सातत्य खूप महत्त्वाचे आहे. एक-दोन वेळा करून नंतर सोडून दिल्यास प्राणायाम जमत नाही. दररोज करून बघा फरक थोडे दिवसांनी तुम्हाला समजेल. एकदा व्यायामाची आवड निर्माण झाली की एक दिवस जरी केला नाही तरी तुम्हाला करमणार नाही तर मग लॉकडाऊन मध्ये व्यायाम करायला सुरुवात करणार ना?
Comments
Post a Comment